रविवार, १४ ऑगस्ट, २०१६

मनोरथ

काय???बदली पुन्हा एकदा. घ्या आवरायला बिऱ्हाड. बिऱ्हाड भरा. बिऱ्हाड उतरवा. नविन गाव. नविन घर. नविन शेजार. नविन माणसं. नविन मित्र. मित्र नविन-जुने असतात का? मित्र मित्र असतात. त्यात नविन जुने काय नसते. एक मिनिट आपण हे कसं विसरलो कि आपलं बिऱ्हाड कायमस्वरुपी स्थिरावले ते. शेवटचा मुक्काम. सोहळा वैगेरे करुन आलो रहायला. राहिला प्रश्न ह्या बदलीचा; त्याने काही विशेष फरक पडणार नाही. जवळच झाली आहे बदली. पुर्वीपेक्षाही जवळ. आपल्या बाबांचा त्रास कमीच झाला ना बरचं झालं एकापरिने. जे झालं ते चांगल्यासाठीचं झालं.
करमलं नाही मला त्यादिवशी इतकं. का नसेल करमलं मला, हे माहित असुनही कि ह्या बदलीने आपल्या आयुष्यात तसुभरही फरक पडणार नाही. ट्राफिक जाम झालं डोक्यात. एकामागुन एक आठवणी यायला लागल्या डोक्यात. माणुस आला म्हणजे ओघाने आठवणी आल्याचं. ह्या आठवणी वैगेरे ना खुप फिलॉसॉफिकल वैगेरे असतात. पण ह्या फिलॉसॉफिला खऱ्या अर्थाने अर्थ आहे. माझ्या मते फक्त आठवणींची फिलॉसॉफी प्रॅक्टीकल आहे. बाकीच्यांबद्दल न बोलणेच योग्य.
खुप वेळा बदली झाली बाबांची एका शाळेतुन दुसऱ्या शाळेत. संस्थेचा नियम होता तो सहा वर्षांपेक्षा जास्त एकाच शाळेत सेवा नाही. त्यामुळे खुप वेळा बदली झाली. प्रत्येक वेळेस ही बदली घाव घालायची. जखम द्यायची. मग त्यावर खपली येणार. सगळं पुर्ववत होणार. मात्र व्रण नक्की पडणार. ह्यावेळेस जखम थोडीच झाली आहे तरीही वाईट वाटतयं. उगाचचं करमत नाही. त्या व्रणांना बघुनच दुःख होत आहे.
एखादी घटना घडते, त्यामुळे आपल्या आयुष्यात बदल होतो, काही गवसतं, काही हरवतं, तेव्हा हरवल्याचं दुःखही होतं. पण जेव्हा आपण काही काळाने मागे वळुन बघतो तेव्हा आपल्याला जास्त दुःख होते. कारण काळाच्या ओघात आपल्याला जाणीव होते. त्या घटनेने हिरावुन घेतलेल्या गोष्टींची व त्या गोष्टींची आपल्या आयुष्यात असलेल्या महत्वाची.
बाबांची जेव्हा अरणगावला बदली झाली तेव्हा मी फक्त दीड महिनांचा होतो. प्रवरेच्या पाण्यापासुन साधारण अडीचशे किमी लांब. सात वर्षांचा होईपर्यंत होतो तिथे. मध्ये कधीतरी राशीनला पण दोन-तीन महिने बदली होती. पण पुन्हा लगेच परतलो होतो अरणगावला.अर्थातच खुप काही आठवत नाही अरणगावचं.
अरणगाव म्हटलं कि माझ्यासमोर काही प्रसंग, काही चित्र, काही फोटोग्राफ्स डोळ्यांसमोर उभे राहतात. त्या फोटोग्राफ्संना जोड असते सबटायटल्संची. आई-बाबा जे किस्से सांगतात ना अरणगावची त्यातुनच ही सबटायटल्स जन्माला येतात. सबटायटल्स आणि दृश्य जुळवुन 'अरणगावच्या आठवणी' नावाची फिल्म कशी बशी डोक्यात चालते. 
कोळपेवाडी नेहमीच लक्षात राहील. तिथे मित्रांबरोबर सगळ्यात जास्त मजा केली. तिथल्या अनेक गोष्टी अजुनही लक्षात आहे, जश्याच्या तश्या. अर्थातच तिथले सगळे मित्र व्हॉटस् अप मुळे संपर्कात आहेतचं.  त्यादिवशी रस्त्यावरुन जात असताना दोन मुलांना पायी शाळेत जाताना बघितलं. त्यावरुन एक कोळपेवाडीचा मित्र आठवला त्याच्याबरोबरही पायी शाळेत जायचो. 
इंजिनियरींग च्या पहिल्या वर्षाला जेव्हा मी कोळपेवाडीच्या घोरपडेला भेटलो, तेव्हा क्षणभर मी त्याला ओळखलचं नाही. चेहरा वैगेरे सगळं काही नीट व्यवस्थित आठवत होतं.म्हणजे त्याबरोबर केलेली सगळी मजा क्षण आठवले. फक्त त्याचं नाव आठवत नव्हतं. तेव्हा लक्षात आलं की आपल्याला माणसांपेक्षा त्यांबरोबर घालवलेले क्षण जास्त आठवतात.
लोणीबद्दल कधीच काही वाटलं नाही नि वाटणार नाही. कारण तिथे फक्त ओळख झाली. मित्र तिकडे बनलेच नाही. लोणीला माझ्यामध्ये जो काही अात्मविश्वास होता तो मी गमावला इतकचं.
माझा एक मित्र मला म्हणाला कि ' तु खुप सेन्सेटिव्ह ' आहे. सेन्सेटिव्ह म्हणजे संवेदनशील. सेन्सेटिव्ह म्हणजे पटकन रिॲक्ट करणारा. माणुस सेन्सेटिव्ह कधी होतो. जेव्हा एखादी गोष्ट त्याकडुन हिरावुन घेतली जाते, एकदा, दोनदा, पुन्हा पुन्हा. मग पर्यायाने तो रिॲक्ट करणारचं ना मग गोष्ट कितीही छोटी असो अथवा मोठी. मुळातच आपला समाजचं सेन्सेटिव्ह आहे. बघाना जेव्हा सेन्स नसलेले लोक वेगळ्या विदर्भाची मागणी करतात ना तेव्हा आपण सेन्सेटिव्ह बनतोच ना. आय एम नो मोअर एक्सेपशन.
भीती हि सेन्सेटिव्ह पणाची दुसरी बाजु आहे. मी जसा सेन्सेटिव्ह आहे. तसा भित्रा ही आहे. मी खुपच मीपणा करतो आहे. पण आमच्यासारख्या सेन्सेटिव्ह लोकांना व्यासपीठ कमीच मिळत. कारण लोक आपल्या भित्रेपणाची टिंगल उडवतील ही वेगळीच भिती. मग प्रेम केले तर .समजा एखादी मुलगी आवडली. अट्टाहास करुन तिचं नाव माहित केलं. नाव आले म्हणजे जात धर्म आलाचं. (शहरातील लोकांनी जात पात न मानन्याचा दावा मुळीचं करु नये,त्यांच्यासारखा मुखावटा आम्ही घालत नाही,त्यामुळे आम्ही जुनाट जातीयवादी ठरतो इतकचं.)त्यात ती आपल्या जातीची निघाली तर अतरंजित स्वप्न कल्पना आल्याच. मग पुन्हा हिरमोड त्यापेक्षा नकोच ती झंझट. तसही आमच्या तोंडाकडे बघुन कोणालाही काहीच वाटत नाही.
हा माझा शेवटचा ब्लॉग. मी ब्लॉग लिहायचं ठरवलं ते मनातलं व्यक्त करण्यासाठी. मी पाच ब्लॉग लिहीले. हा सहावा. मी राजकारण,समाजकारण, एेतिहासिक सगळ्यांवर लिहण्याचा प्रयत्न केला. ललितनिबंध ही लिहण्याचा प्रयत्न केला. वाचकांनी  चांगला प्रतिसाद दिला. महत्वाचं म्हणजे खुप काही शिकलो. मी आचार्य अत्रे यांच पहिलं पुस्तक आठवीला वाचले. त्यानंतर त्यांच्या लेखांची भाषाणांची अनेक पुस्तक वाचली. त्यातुन मला माझा राजकीय नि सामाजिक विचार मिळाला. आता त्यावर ठाम रहायचं. शाळेत जेव्हा मला विचारायचे कि ' तुझे आदर्श कोण?' .आता उत्तर मिळालं .माझे आदर्श आचार्य अत्रे. मला त्यांच्यासारखं बनायचं नाही पण मला त्यांच्या सारखं जगायचं आहे. बेभान!!!!
धन्यवाद.....!!!
जय महाराष्ट्र!!!!!
©परिक्षित रामचंद्र भुजबळ 

गुरुवार, ७ जुलै, २०१६

संघर्ष आणि पैसा

रविवारी सकाळचा उत्तरार्धा व दुपारचा पुर्वार्ध हा खुप कंटाळवाणा असतो.खुप आळस आलेला असतो.अश्याच कंटाळवाण्या वातावरणात आमच्या वडिलांचे मित्र चिमाप्पा येऊन थबकले.अकोल्यावरुन काही कामानिमित्त संगमनेरला आले होते.काम उरकल्यावर थेट मित्राला भेटायला घरी आले होते.मग वडील व त्यांच्या गप्पा रंगु लागल्या.दोघेही शिक्षक त्यामुळे गप्पांसाठी विषयांची कमतरता नव्हती.
आमचे वडील रयत मध्ये तर चिमाप्पा स्थानिक खाजगी संस्थेत.त्यामुळे बहुतांश गप्पांमध्ये तुलनाच चालु होती.मी मात्र शेजारच्या सोप्यात कान देऊन एेकत होतो.त्यांची चर्चा कम गप्पा "अतिरिक्त शिक्षक" या संदर्भात चालु होती नि त्याचवेळी आईने हाक मारली म्हणुन तो मुद्दा माझा एेकायचा राहुन गेला.मी आईकडुन परतलो तेव्हा नेमका वडीलांना फोन आला व ते बाजुला जाऊन बोलु लागले.मग मी संधी साधुन चिमाप्पांना विचारलं ही ''अतिरिक्त शिक्षक काय भानगड आहे? "
त्यावर मला चिमाप्पांनी एकदम शिक्षकी तोऱ्यात समजवायला सुरुवात केली-
"समज एक गाव आहे.तेथील धनाढ्यांनी व जमिनदारांनी मिळुन एखादी शाळा सुरु केली व काही वर्षांनी तिला पुर्ण मान्यताही मिळाली.आता समजा तेथे एखादी इयत्ता आहे,त्यात १०० विद्यार्थी दोन तुकड्यांत शिकतात.एका तुकडीला दीड शिक्षक ह्यानुसार दोन तुकड्यांना तीन शिक्षक.तर आता एक दिवस सरकार पटपडताळणी करायचे ठरवते नि त्या ऑनलाईन प्रक्रियेतुन सरकारचे असे लक्षात येते की १०० पैकी २५ विद्यार्थी बोगस आहेत नि मुळात दोन तुकड्या कधीच नव्हत्या.एकाच तुकडीत ७५ विद्यार्थी बसवले जात.याचा अर्थ असा की एक तुकडी पुर्ण बोगस होती.बरं हे उपद्व्याप करण्यामागे कारण काय?...तर विद्यार्थी वाढल्याने,तुकडी वाढते व तुकडी वाढल्याने एक शिक्षक वाढवण्याची मुभा भेटते नि तो शिक्षक भरण्यासाठी आरामात वीस ते पंचवीस लाख रुपये उकळले जातात.अश्याप्रकारे संस्थाचालक शाळेत गुंतवलेली रक्कम वसुल करतात.हा बोगसपणा उघड झाल्यावर हे जे वाढवलेले शिक्षक म्हणजेच अतिरिक्त शिक्षक ठरतात.सरकार ह्या शिक्षकांचे पुनर्वसन करते कारण सरकारने त्यांना मान्यताही दिली आहे व त्यांना पगारही देत आहे."
चिमाप्पांच स्पष्टीकरण थक्क करणारं होत.हा बोगसपणा अनेकदा वाचला होता,एेकला होता पण त्यामागचं अर्थकारण जास्त धक्कादायक आहे.सरकार अश्या कितीतरी शिक्षकानां पोसत आहे ज्यांची कधी गरजच नव्हती.पोसणारा पैसा अर्थातच सामान्यांचा आहे.भ्रष्टाचार...!!!!
त्यानंतर बुधवारी लोकसत्ता मध्ये नविन येऊ घातलेल्या शैक्षणिक धोरणावर लेख गिरीश कुबेर यांनी संपादकीय मध्ये लिहिला होता.तसे गिरीश कुबेर यांचे जातीय राजकारणाविषयी मत मला कधीच पटत नाही.असो.बाकी क्षेत्रावरील त्यांच्या मतांबाबत मला कधीही संशय वाटत नाही.तर ह्या लेखात कुबेरांनी टी.एस.आर. सुब्रमण्यम यांच्या समितीने तयार केलेल्या शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यावर बरेच मते मांडली होती.त्यातुन एक निष्कर्ष निघाला की पाचवी पर्यंत शिक्षण मातृभाषेतच हवे पण संस्कृत ची सक्ती नको कारण जी भाषा मुळातच फक्त एका विशिष्ट समाजाने 'आमची मक्तेदारी' या तोऱ्याने वापरली व समाजात वर्चस्वासाठी बहुजनानां शिकु दिली नाही ती भाषा आता सरकारच्या मते बहुभाषिक भारताला एक करण्यास मदत करेल.ह्यासारखा केविलवाणा तर्क नाही.दुसरं असं की कमी पट असणाऱ्या शाळांची संख्या कमी करणे.हेही चुकीचचं कारण एखाद्या आदिवासी पाड्यात जर कमी संख्येची शाळा भरत असेल तर ती बंद करुन तिच विलीनीकरण करावे,असे सांगुन त्या पाड्यावरील एक आशेचं किरण धुसर सरकार करत आहे.आणखी महत्वाची गोष्ट खाजगी संस्थाबद्दल .अश्या संस्थानां प्रोत्साहन द्यावे पण त्यावर अंकुश ठेवुनच. त्यांचा राजकारण्यांशी संबंध तोडावा ज्याने भ्रष्टाचार शमेल. पण ह्या एेवजी सरकार त्यांच सरकारीकरण करण्याबाबत विचार करत आहे जी आत्महत्या ठरेल.एकुणच आपल्या तीन तेरा वाजलेल्या शिक्षण व्यवस्थेचा ह्या धोरणाने काहीही होणार नाही.
त्याच दिवशी संध्याकाळी सातवा वेतन आयोग लागु झाल्याची बातमी शाळेतुन आलेल्या वडिलांच्या कानावर घातली.पण त्यावर त्यांची प्रतिक्रिया 'त्यात काय विशेष नाही' एवढीच.पुढे त्यांनी मागच्या वेतन आयोगाशी तुलना करुन नाराजी व्यक्त केली.त्यातही राज्य सरकार किती टक्के देणार यावरही साशंकता व्यक्त केली.'केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही आयोग लागु करावा',हा आमच्या वडिलांच्या मते,शरद पवारांनी मुख्यमंत्री म्हणुन घेतलेला एकमेव उत्तम निर्णय.('हे शक्य झाले पवार साहेबांच्या धोरणामुळेच' हे येथे तंतोतंत लागु पडते)
शुक्रवारी संध्याकाळी वाढदिवसानिमित्त भेट मिळालेले पुस्तक वाचत बसलो.सुदीप नगरकर यांचे मी वाचत असलेले पहिलेच पुस्तक.वाचत असताना बैठकीच्या खोलीतुन आवाज येऊ लागला.कोणं आलं असावा म्हणुन तिकडे गेलो असता आमचे प्लंबर जे आजोबांचे भाडेकरु होते ते भाडे देण्यासाठी आले होते.एक सिव्हील इंजिनियरींग चा विद्यार्थी असल्याने त्यांच्याशी संवादातुन नेहमीच अनुभवात व महितीत भर पडते.त्यामुळे त्यांचाशी संवाद साधण्यात नेहमीच उपयोगी ठरते.
त्या गोयकर बंधुनी नुकतचं एक बंगलोर च खुप मोठं काम पुर्ण केले होते.त्या संदर्भात जाणुन घेण्याची इच्छा होती.ते एका मोठ्या शाळेच्या इमारतीच काम होते.साधारण पाच मजली. तिथे इंग्रजी माध्यमाचे आठवी पर्यंत चे वर्ग होते.त्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक वर्ग डिजीटल होता त्या बरोबर ए सी व अश्या अनेक सोई ज्याच्या फक्त कल्पनाच करता येऊ शकते.आधुनिकीकरण स्वच्छतेपासुन दिमाखतेपर्यंत सगळीकडे नुसती श्रीमंती.हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, चकितपणा, स्वप्नातल्या कल्पना प्रत्यक्ष बघितल्याच समाधान सगळी काही होतं.पुढे त्यांनी सांगितल की प्रत्येक विद्यार्थ्याकडुन साधारण दीड लाख रुपये डोनेशनच्या नावाखाली घेतले जाणार होते.साधारण १४-१५ कोटी रुपयांची ' गुंतवणुक ' होती.पुढच्या वर्षी निव्वळ नफा यायला सुरवात होईल.
पुढे विषय निघाला व त्यांनी सांगितल की त्यांच्या मुलीने सावित्रीबाई फुले प्रज्ञा परिक्षेत तालुक्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे.ती आमच्या संगमनेरातील अतिशय छोट्याश्या मेहेर शाळेत शिकते.त्यामुळे शहरातील दुसऱ्या मातब्बर शाळेतील मुलीनां मागे पाडत तिने क्रमांक पटकावला होता.ते सांगत होते की, शाळेतील शिक्षकांनी तिला अक्षरशः डोक्यावर घेतले.त्यांना अभिमान वाटत होता.
माझ्या मते,आपल्या देशात कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत.एक म्हणजे पैसा व दुसरा म्हणजे संघर्ष.पहिला पर्याय मुठभर लोकांसाठी आहे तर दुसरा पर्याय सर्वांसाठी खुला आहे.आपल्या जर हातात असेल तर आपण पैश्याचा सोईस्कर मार्ग निवडु शकतो पण पैसा नसेल तर संघर्ष आपल्याला निवडुन मोकळा होत असतो.
जो आदर एकेकाळी सर्वांना हवाहवासा वाटत होता तो शिक्षकांबद्दलचा आदर आजकाल लाखोनां विकत भेटतोय. आमचे वडील असोत किंवा चिमाप्पा त्यांनी हा आदर संघर्षाने मिळवला.ते ही अश्या आदिवासी व दुर्गम अकोल्यासारख्या भागातुन आले, कष्ट केले, दररोज काही किमी प्रवास केला,पैसे नसताना अगदी चालत प्रवास केला,संघर्ष केला व साध्य केले.पण आता जर आदिवासी भागातील मुलांपुढे उपलब्ध असलेला एकमेव संघर्षाचा पर्याय जर शाळा बंद करुन हिरावुन घेतला तर...? सातव्या वेतन आयोगावर कनिष्ठ कर्मचारी खुश नाहीयेत ते आता ' पैश्यांसाठी ' संपरुपी संघर्ष करण्याच्या तयारीत आहेत. कोटी रुपायांच्या इमारतीत लाखो रुपये भरुन मुले शिकणार आहेत खरी एकीकडे तर दुसरीकडे त्या इमारत बनवणाऱ्यांची पोर मोठ्या जिद्दीने आपल्या संघर्षाने छोट्याश्या शाळेच नाव गाजवणार आहे.आजुबाजुला बघितले ना तर अश्या अनेक संघर्षाच्या व पैश्याच्या गोष्टी आहेत. आपला हा महान समाज ह्या दोघांत असलेल्या भल्या मोठ्या दरीत रुतलेला आहे.दुसरा पर्याय खुला आहे, कठीण आहे, पण जिंकुन देणारा आहे......संघर्षाची गरज आहे ह्या दरीत रुतलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी,कारण त्यासाठी पैश्याचा सोईस्कर मार्ग नाहीये.प्रश्न हा आहे की आपण संघर्षासाठी तयार आहोत का?????
©परिक्षित रामचंद्र भुजबळ 

सोमवार, ३० मे, २०१६

द्रविडी चष्म्यातुन बघताना

" द्रविडी चष्म्यातुन बघताना "
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जयललिता यांच्या नेतृत्वाखाली तमिळनाडुत अण्णा द्रमुक ने  आपली सत्ता राखली. तसे तमिळनाडुत सत्ता मिळवण्यापेक्ष्या सत्ता राखणे कठीण, पण जयललितांना हे सोपे गेले. याची दोन कारणे. त्यातील पहिल कारण वृद्धत्वात असलेले करुणानिधी व त्यांचा अतंर्गत कलहाने पोखरला गेलेला द्रमुक पक्ष. करुणानिधी यांचा पुत्र स्टॅलिन ला आपल्या भावालाच विश्वासात घेण्यात यश आले नाही तर कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करणे दुरच. असा अशक्त पक्षाला व नेतृत्वाला जनतेने नाकारणे कमप्राप्त होते. दुसरं कारण म्हणजे महिलांचा असलेला जयललितानां  प्रचंड पाठिंबा. ह्या महिला अम्मांना अटक झाल्यावर ओक्साबोक्सी रडत होत्या, तर जेलमधुन सुटल्यावर अक्षरशः रस्तोरस्ती नाचत होत्या, फुगड्या घालत होत्या यावरुन अम्मांवर असलेले महिलांचे प्रेम दिसुन येते.हेच प्रेम मतपेट्यांतुनही व्यक्त झाले.उत्तरेकडील स्वयंघोषित राष्ट्रीय हिंदी प्रसार माध्यम ह्या निवडणुकीत तामिळ अस्मितेचा मुद्दा होता असा बालिश उल्लेख करतात अर्थातच अर्धवट ज्ञानाच्या धनी असणाऱ्या माध्यमांकडुन दुसरी अपेक्षा काय करणार. पण महत्वाचं हे आहे की मराठी माणसाने तमिळनाडुकडुन काय घ्यावे? त्याचाच शोध घेण्याचा हा प्रयत्न.
साधारण इ.स १९२० साली द्रविड क्रांती ला सुरुवात झाली .ह्या क्रांती मागे आर्य विरोध अर्थात ब्राम्हण विरोध हा एक सुत्री कार्यक्रम होता. ह्या विरोधामागे एक इतिहास होता; तो असा की दक्षिणेकडे द्रविड लोक अगदी गुण्यागोविंदाने राहत होते, त्यांमध्ये ना कोणतीही जात पात होती नि कोणतेही भेदभाव. अश्या ह्या हेवा वाटणाऱ्या द्रविड संस्कृती वर हे कर्मकांडी, भोंदु आर्य लोक येतात काय नि ही संस्कृती उद्धवस्त करतात काय. ह्या सर्व वर्चस्व मिळवणाच्या लढाईला, आर्यांनी द्रविड लोकांच्या कुलदैवत असणाऱ्या विष्णु देवाच्या अवतारांच्या नावाने आपले कपट खपवुन नेले. अर्थात ह्या सर्व पुराण कालीन गोष्टी आहेत पण तरीही त्यांच महत्व तेवढच. यात एक गोष्ट अधोरेखीत होते ती म्हणजे आर्यांनी केलेला द्रविड संस्कृती मध्ये प्रवेश व त्यानंतर माजवलेले स्तोम, या स्तोमांपैकी एक म्हणजे संस्कृत भाषेची बळजबरी व वर्चस्वासाठी निर्माण केलेली चार्तुवर्ण पद्धती.हेच खरे आर्य अर्थात ब्राम्हण विरोधाचे मुळ आहे, 'आमचा भगवद् विष्णु भेदभाव सांगत नाही, त्यामुळे आम्ही तो मानत देखील नाही व आमच्या तमिळ भाषेविरुद्ध उठलेल्या ह्या समजाला आम्ही उलथुन लावु' ह्या भावनेतुन तमिळनाडुत पेरियार(टोपण नाव) यांच्या नेतृत्वाखाली जनक्रांती सुरु झाली.या क्रांती च्या पहिल्या टप्प्यात तमिळ भाषेचे शुद्धीकरण करण्यात आले म्हणजेच तमिळ बोलीभाषेतुन संस्कृत शब्दांना वगळणे.तो टप्पा त्यांनी पार केला. पुढील टप्प्यात त्यांनी प्रशासनावर असलेले ब्राम्हणांचे वर्चस्व व महत्व कमी केले.पुढे स्वातंत्र्यानंतर अण्णादुराई यांनी पेरियार यां पासुन फारकत घेऊन द्रमुक ची १९५६ साली स्थापना करुन राजकारणात उडी घेतली. दरम्यान १९६७ पर्यंत तमिळनाडुत काँग्रेस ची सत्ता होती,तरी पेरियार यांच्या झंझावतापुढे नमते घेऊन काँग्रेस नेतृत्वाला राजाजी हा ब्राम्हण मुख्यमंत्री पदावरुन हटवुन, नदार जातीच्या कामराज यांना मुख्यमंत्री बनवावे लागले.
१९६७ नंतर द्रमुक ने संपुर्ण तमिळनाडुचा राजकीय ताबा घेतला व अण्णादुराई मुख्यमंत्री झाले.पुढे त्यांच्या निधनानंतर एम.करुणानिधी मुख्यमंत्री झाले, पण त्यांना त्यांच्या पक्षातुनच एम.जी.रामचंद्रन अर्थात एम जी आर यांच आव्हान उभं राहिलं. सुपरस्टार असलेले एम.जी.आर तरुणांसाठी देवच होते. याच प्रसिद्धी चा फायदा उचलत त्यांनी अण्णा द्रमुक ह्या पक्षाची स्थापना केली व सत्ता मिळवली. मात्र त्यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक चे ही दोन भाग झाले, एका भागाने जयललिता ह्या एम. जी.आर यांच्या सहकलाकाराबरोबर जाणे पसंत केले तर उर्वरीत कार्यकर्ते एम.जी.आर यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन यांसोबत राहिले.पुढे विधानसभा पराभवानंतर जयललितांच्या नेतृत्वाखाली अण्णाद्रमुक पुन्हा एक झाली नि त्यांची सत्ता वापसी झाली. पुढे आलटुन पालटुन द्रमुक नि अण्णा द्रमुक यांची सत्ता तमिळनाडुत होती व पुढच राजकीय इतिहास सर्वज्ञात आहे.
तर मराठी भाषिकांना यातुन काय बोध घ्यावा? क्रमांक एक, भाषेचे शुद्धीकरण. मराठी भाषेचे प्रथम शुद्धीकरण छत्रपतींनी आपल्या प्रशासनातुन घडवुन आणले नि दुसरे शुद्धीकरण सावरकर यांनी केले. पण आपल्याला शुद्धीकरण करयाचे नसुन ते टिकवण्यासाठी धडपडायचे आहे.आज इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले आहे.ह्या पैसै कमवण्याचा धंदा करणाऱ्या शाखांमध्ये मराठी ची अवस्था वाईट च आहे. इंग्रजी माध्यमात शिकल्याने फक्त इंग्रजी भाषेवर(?) प्रभुत्व मिळवु शकतो पण ज्ञानावर नाही ही समजुन आजच्या मराठी माणसाने घ्यायला हवं. तरच पुढची पिढी सुधारेल, कारण इंग्रजी बोलुन समाज पुढ जात नाही तर समाजाशी नाळ जोडुन पुढे जातो. इंग्रजी माध्यमातील मराठी मुलं बहुतांश अमराठी मुलांबरोबर वाढतात त्यामुळे मराठी समाजाशी त्यांची कधी नाळच जुळत नाही आणि जर नाळच जुळली नाही तर समाज पुढे जाईलच कसा. याचा प्रत्यय मला वैयक्तिक पातळीवर माझ्या अवतीभोवती वावरणाऱ्या इंग्रजी माध्यमातील मराठी मुलांकडुन आला आहे. आता क्रमांक दोन. राष्ट्रीय पक्षांची हकालपट्टी,ही हकालपट्टी द्रविडांनी केली, हे आपण देखील करायला हवं.काँग्रेस,भाजप व स्वतःच्या जाहिरनाम्यात परप्रांतियांना वचन देणारा विघ्न संतोषी राष्ट्रवादी यांची हकालपट्टी व्हावीच. कारण राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक अस्मिता व त्या साठी लढणाऱ्यांना न्याय देऊ शकत नाही. उदाहरणार्थ, बेळगाव प्रश्न; यासंदर्भात काँग्रेस ने कधीच कणखर भुमिका घेतली नाही कारण कर्नाटक मध्ये त्यांना तोंड दाखवायच होत. तीच परिस्थिती भाजपची. त्यामुळे हे घोंगड जोपर्यंत प्रादेशिक अस्मिता असलेला व प्रचंड राजकीय इच्छाशक्ती असलेला पक्ष सत्तेत येत नाही तोपर्यंत तरी भिजत राहणार यात शंका नाही. यावर आपलेच काही मराठी भाषेचे अजातशत्रु व स्वयंघोषित बुद्धीवादी लोक म्हणतील की हा मुद्दा फक्त केंद्र सरकारच सोडवु शकतो हे एकवेळ खरे असेल पण जर प्रादेशिक सरकारांनी आपले मत व्यवस्थित व प्रखरतेने मांडलेच नाही तर केंद्र सरकार आपल्याला महत्व कसे देणार तर न्याय दुरची गोष्ट. इथेच खरी गोम आहे.काँग्रेस सरकारांनी फक्त दिखावा म्हणुन आपली मते मांडली ती पण दिल्लीतील इशाऱ्यावरुन नि कर्नाटक तील राजकीय परिस्थिती बघुन. फक्त बेळगाव हा एकच प्रश्न नाही, असे अनेक प्रश्न आहेत ज्यात महाराष्ट्राने ह्या तथाकथित राष्ट्रीय पक्षांच्या राजकारणापायी बघ्याची भुमिका घेतली व परिणाम तमाम कोट्यावधी मराठी जनता भोगत आहे.
आजच तमिळ राजकारण देखील खुप काही शिकवतो. त्यातील महत्वाचं म्हणजे, महिला सक्षमीकरण. आज तमिळनाडुत १००० पुरुषांमागे ९९६ महिला आहेत. हे प्रमाण आपल्या सारख्या देशाला पुरोगामी विचार देणाऱ्या राज्याला लाजवणारे आहे. आजही आपल्याकडे स्री भ्रुण हत्या होताना दिसत आहे. देशाला पहिली शिक्षिका व पहिली महिला डॉक्टर देणाऱ्या राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळाली नाही. दुसरीकडे जयललितांचा जाहिरनामा वाचल्यावर स्रियांसाठी केलेल्या घोषणा व त्यांचे असलेले राजकीय महत्व लक्षात येते. त्याउलट पुरोगामी महाराष्ट्रात महिलांना राजकारणात उतरण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आरक्षित होण्याची वाट बघावी लागली.आजची परिस्थिती अशी आहे की ज्या समाजाला कर्मकांडापासुन दुर नेण्याचा प्रयत्न समाजसुधारकांनी केला. त्याच कर्मकांडाकडे महिलावर्गाला आजच्या काही महिला प्रसिद्धी साठी नेत आहे. म्हणजे आपली समाजाची चाकं उलट दिशेने फिरत आहे. आपले संत लोक उगाच सांगत बसले की देव माणसात आहे दगडात नाही. राहिला प्रश्न महिला राजकीय नेतृत्वाचा तर राष्ट्रवादी च्या सुप्रिया सुळे सक्रिय नाहीयेत. दुसऱ्या फळीतील नेत्यांना संधी न देण्याच्या अट्टाहास शिवसेनेचा असल्याने निलीमा गोऱ्हे यांच्यासारख्या हुशार व अभ्यासु नेत्यांना संधी मिळणार नाही. पंकजा मुंडे बहुजन असल्याने भाजप संधी देणार नाही. त्यामुळे सक्षम महिला नेतृत्व महाराष्ट्राकडे नाही.
आता प्रश्न आहे आरक्षणाचा, तमिळनाडुत ६९% आरक्षण आहे. आपल्या महाराष्ट्रात अश्या अनेक आरक्षणाच्या मागण्या प्रलंबित आहेत. हा मुद्दा तमिळ राजकारण्यांनी योग्य वेळी व योग्य प्रकारे हाताळुन निकाली लावला. याउलट आपले राजकारणी आरक्षणाच्या माध्यमाने जोरदार जातीय ध्रुवीकरण करतायेत.तिकडे जातीय दंगली होतात पण त्यांना राजकीय पाठिंबा नसतो कारण कोणतीही जात तिकडे बहुसंख्य नाही त्यामुळे एका जातीच्या पाठिंबा मिळवला की निवडणुक जिंकली असे नाही. तेथील जातीय हिंसा लवकर नियंत्रणात येत कारण हिंसेला सबळ राजकीय पाठिंबा नसतो.
तमिळ मतदार हे जातीपेक्षा राजकीय प्रश्नांवर जास्त मतदान करतात: त्याचे उदाहरण म्हणजे पेन्नियार बहुसंख्य असलेल्या मतदार संघातुन द्रमुक चा पेन्नियार उमेदवार अण्णा द्रमुक च्या दलित उमेदवारकडुन पराभुत होतो कारण त्यांना स्व जातीच्या उमेदवारापेक्षा अम्मांना पुन्हा निवडुन देण हे जास्त महत्वाचं वाटलं.' जातीने मतदान करा पण जातीला मतदान करु नका ' ( Cast your vote, but don't vote to your caste ). हेच तमिळ जनता दाखवुन देते.
भाजपने तमिळनाडुत हिंदुत्वाच्या माध्यमातुन शिरकाव करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फायदा मिळाला नाही कारण अवघ्या ५% असलेल्या मुस्लीमांसमोर ध्रुवीकरण काय होणार त्यामुळे त्यांनी स्थानिक जातपुरस्कृत छोटे पक्ष बरोबर घेऊन बहुजन समाजात जनमत तयार करण्याचा प्रयत्न चालु केला आहे. हाच प्रयोग महाराष्ट्रात महाजन-मुंडे यांनी माधव नावाने (माळी धनगर वंजारी) केला होता.पण सत्ता मिळताच,मुंडे नंतर व आता भुजबळ यांच्या अटकेनंतर बहुजन समाजात पोरकेपणाची भावना निर्माण झाली आहे.सत्तेत या समाजाला वाटा न देऊन भाजपने आपली खरी लायकी दाखवली आहे. ही लायकी ओळखायला मराठी बहुजनांना उशीर झाला. पण तमिळ जनता जास्त प्रगल्भ आहे व ते भाजपला थारा देणार नाही हेच सत्य.
यातुन अन्वायर्थ हाच निघतो की वरकरणी जरी द्रविड समाज व्यक्ती पुजक, देव भोळा, कट्टर वाटत असला तरी राजकारणात त्यांची प्रगती ही वाखण्यासारखी व आदर्श आहे व मराठी माणसाला ह्या द्रविडी चष्म्याची नितांत गरज आहे.
© परिक्षित रामचंद्र भुजबळ

शुक्रवार, २९ एप्रिल, २०१६

'' संयुक्त महाराष्ट्र म्हणजे काय…?''

संयुक्त महाराष्ट्र म्हणजे काय…?'' 
गल्लीतील बंड्याने मला येऊन विचारले कि ,''  संयुक्त महाराष्ट्र म्हणजे काय…?'' . 
काय उत्तर द्यावे बर याचे .तसे एका वाक्यात उत्तर देता आले असते पण या प्रश्नाचे संदर्भासहित स्पष्टीकरण देणे हे मराठी माणसाचे कर्तव्य आहे, असे मानुन मी याचे उत्तर देणार आहे. मुळात ह्या महाराष्ट्रातील १०० मुलांना जर हा प्रश्न विचारला तर त्यातील फक्त ५ जणांना संदर्भासहित ह्याचे उत्तर देता येईल . मी त्या पाचातलाच आहे . मला हा लढा समजला ,रक्तात भिनलाच म्हणाना तो प्र . के .अत्रे यांच्या मुळे .स्वातंत्र्यलढ्यात  ज्यांच्याबरोबर राहिले त्यांच्याच विरोधात उभे ठाकले ते अत्रे. सत्तेची मलई चाखता आली असती पण मातृभाषेसाठी काहीही कुर्बान म्हणणारे अत्रे . 
संदर्भात काय सांगावे हे आहे माझ्या लक्षात , आम्ही भाषावार राज्य मागितले म्हणजे जणू काही वेगळे राष्ट्रच मागितले असे सांगणाऱ्या समित्या ह्या संदर्भात पक्क्या बसतील ,कोण कोणत्या आहे त्या समित्या ???? हो आठवल .,दार कमिशन ,जे . व्ही .पी कमिटी आणि हो फाजील आयोग सुद्धा . ह्या सर्व  समित्यांच एकच म्हणण होते ते म्हणजे  'भाषिक राज्याच्या बुडाशी उपराष्ट्रवाद आहे' आणि इतकाच नाही महाराष्ट्राचा अवमान करणारी अनेक आर्जव होती त्यात काय होती बर ती आर्जव ' मुंबई ची भरभराट गुजराथी समाजामुळेच झाली ','मुंबई महाराष्ट्राला दिली तर मुंबई ची अधोगती होईल ',व अशीच अनेक वक्तव्य होती त्यात.मला तर हेच समजत नाही कि जर मुंबईची भरभराट त्यांच्यामुळे झाली असेल तर त्यांनी त्यांच्या राज्यांत अश्या ५-६ मुंबई उभ्या का केल्या नाही?,असे प्रश्न काही मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही, तर असो .
स्पष्टीकरणात भरपूर आहे सांगण्यासारखं,सेनापती बापट, एस.एम.जोशीप्रल्हाद केशव अत्रेश्रीपाद डांगेशाहीर अमर शेख,प्रबोधनकार ठाकरे हे चळवळीतील महत्त्वाचे नेते.एस.एम. जोशीश्रीपाद डांगे यांनी लढ्याचे नेतृत्व केले. अत्र्यांनी आपल्या 'मराठा' या दैनिकात संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला तर विरोधकांवर बोचरी व कठोर टीका केली. त्यांच्या भाषणातून संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. शाहीर अमर शेख,शाहिर अण्णाभाऊ साठे,शाहिर गव्हाणकर ह्यांनी आपल्या कलाविष्काराने मराठी अस्मिता जागृत ठेवली.
हो पण कुणी कोणासमोर गुढघे टेकले हे न सांगितलेलेच बरे नाहीतार पुरोगामी व गांधीवादी बंड्या च्या मास्तरांच्या भावना दुखावल्या जातील . कुणाला कुणाची निष्ठा महत्वाची वाटते हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, तर असो. 
पोट्टी रामल्लू या क्रांतीकाराने ५८ दिवस उपोषण करून बलिदान दिले व तेलुगु राज्य मिळवले . आम्हीं असे १०६  पोट्टी रामल्लू नी गमावले तेव्हा कुठे आमचा लढा यशस्वी झाला . २० नोव्हेंबर १९५५ ला मुठभर लोकांच्या सभेत आमच्या मराठी रक्ताला काहींनी  आव्हान दिले पाच हजार वर्षांनी सुध्दा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही ' म्हणे . त्यानंतर आमच मराठी रक्त पेटलं,सभा उधळुन लावली.मग नवीन हुक्की आली मुंबई केंद्रशासित करायची . मग पेटलेल्या मराठी रक्ताचा जेव्हा वनवा झाला व त्यात आपला पराभव  दिसू लागला तेव्हा कुठे यांचा घडा भरला व मुंबई महाराष्ट्राला मिळाली पण बेळगाव,निपाणी व कारवार सहित कर्नाटक सीमालगतची मराठी भाषिक गावे नाही मिळाली.  
ह्या लढ्या चे एकच वैशिष्ट आम्हाला मुंबई मिळवण्यासाठी ४ कोटी रोख रुपये व १०६ बळी मोजावे लागेल. 
कल्पनेतल्या बंड्या च्या ह्या प्रश्नांना हे उत्तर पुरेसे आहे . सगळ्या कल्पना आहेत कारण आमच्या इतिहासात आमच्या ह्या लढ्याबद्दल एक वाक्यही नाही.आमचा हा संघर्षमय लढा आमच्या पिढी पर्यंत कधी पोहचवण्यातच आला नाही कारण तो लढा मराठी माणसाचा जरी विजय असला तरी कुण्याच्यातरी अहंकाराचा पराभव होता आणि पराभव जपणारे आमच्या पदरी पडले,तर असो. हा इतिहास पुढच्या पिढी पर्यंत पोहचावा व तो पाठ्यपुस्तकातुन पोहचावा इतकेच वाटते.....
"संयुक्त महाराष्ट्र म्हणजे काय...???",असा जर प्रश्न असेल तर त्याला माझा एक प्रतिप्रश्न अाहे नि तो म्हणजे, 
"बेळगाव,निपाणी कारवार सह संयुक्त महाराष्ट्र कधी होणार ???"
© परिक्षित रामचंद्र भुजबळ रविवार, १३ मार्च, २०१६

दुसरं रुप

                                            " दुसरं रुप"

        'शहर' हा शब्द उच्चारला की आपल्यासमोर एक दृश्य उभं राहत. मग ते शहर कोणतही असो ते दृश्य एकसारखंच असते.तर, काय असत या दृश्यात: सिग्नल वर झालेली ट्राफिक जाम, तिथेच ट्राफिक पोलिसांशी हुज्जत घालणारे  लोक, सतत येणारा कर्णकर्कश आवाज, सतत इकडुन तिकडे उडणारी धुळ, निमुळते गल्लीबोळं, अरुंद रस्ते,सतत घाईत असलेले लोक, बाजारपेठेत असलेली तुफान गर्दी मग कुठेतरी गडबड, कुठेतरी गोंधळ,आरडाओरड आणि अजुन बरच काही असं ओघाने येतच.
        एकूणच काय तर शहरं दरदिवशी प्रदुषित, निरुत्साही, नकोनकोशी व कंटाळवाणी वाटतात, पण हे झाले शहराचे पहिलं रुप . शहराचं दुसर रुप त्याच्या पहिल्या रुपासारखं  निरुत्साही, नकोनकोस, व कंटाळवाण नक्कीच नसतं. शहराचं दुसरं रुप म्हणजे सर्वसाधारणपणे बोलायचं झाल, तर रात्रीच रुप.
        रात्री जर शहरात जर सहज फेरफटका मारायला निघाला तर हळुहळु तुम्हाला नवनविन गोष्टी लक्षात यायला लागतात. एरवी ज्या पालिकेच्या दिव्याच्या खांबाकडे आपण कुणीही  बघत नाही त्याच दिव्यांचा मंद प्रकाश भावल्याशिवाय राहणार नाही. जर हे दिव्याचे खांब रस्त्याच्या दुतर्फा असतील तर एखाद्या रोषणाई असलेल्या वेशीतुन नविन नगरात प्रवेश वैगेरे केल्याचा भास व्हायची दाट शक्यता आहे.(जर तुम्ही भाव विश्वात रमणारे असाल तर).
        दिवसभर जे रस्ते आपल्याला कमालीचे अरुंद वाटतात तेच रस्ते मात्र रात्री बरेच मोठे, मोकळे-ढाकळे वाटतात. ह्या रस्त्यांवरुन दिवसा चालताना कधी एकदाचा हा संपेल अस सारखं वाटत राहत त्याचं रस्त्यांवरुन रात्री चालताना मात्र हा रस्ता कधी संपुच नये असे वाटु लागते ( पण पाय दुखायला लागल्यावर हा रस्ता पण पटकन संपावा असे वाटेल!) .'दिव्याच्या मंद प्रकाशात रस्त्यांवरुन पायपीट करण्याची मजाच काही और आहे'.
         सिग्नलची तर गोष्टंच निराळी असते, मग दिवस असो किंवा रात्र हवेची झुळुक येणे इकडे निश्चित असते . फक्त फरक हा आहे की दिवसा ही 'झुळुक' म्हणजे गरम हवा जी शेजारुन ट्रक गेल्यावर प्रकर्षाने जाणवते व त्यात काळा धुर भर घालुन जातो . पण रात्री जर तुम्ही सिग्नल वर थांबलात (!) तर तुम्हाला थंड गार हवेची 'झुळुक' सुखावुन जावु शकते ( पण याची शाश्वती देऊ शकत नाही ).आणि जरी अशी झुळुक सुखावुन गेली नाही तरी दिवसासारखी त्रासही देणार नाही.
          दिवसभर सारख्या सुचना, गाड्यांची रेल चेल, फेरीवाल्याच्यां 'गार हे गोड हे' ने गजबजलेल्या बस स्थानकाच रात्री वेगळाचं रुबाब असतो. रात्री च्या मुक्कामी बसेस् एका कोपऱ्यात निपचीत असतात. चुकून मुकून एखादी एस. टी येते. बाकी काही गाड्यांची इतकी ये जा नसते. बाकी स्थानकाच्या बाकड्यांवर मुक्कामी लोक झोपलेले असतात, तर काही असेच ताटकाळात बसलेले असतात. चौकशी वाल्या खिडकी त लाईट व पंखा चालु असतो. तिथला कर्मचारी खुर्चीतच निवांत झोपी गेलेला असतो... तिथेच कुठीतरी एफ एम वर जुनी हिंदी गाणे लागलेले असतात. त्या शांत वातावरणात किशोर, मुकेश नि मोहम्मद रफी ची गाणी अधिक सुरेख वाटतात. त्या निवांत  वेळात ह्या तिघांमध्ये श्रेष्ठ कोण हे ठरवू शकतो आपण .
           ज्या निमुळत्या व अरुंद गल्लीबोळां मध्ये गाडीचा आरसा घासला जाणार नाही याची काळाची घेत आपण गाडी चालवतो, त्या गल्ली मध्ये रात्री भटकंती करताना गुफेतुन चालल्याचा भास होतो, त्यात जुन्या पंख्याचा येणारा कर्कश आवाज, कुत्र्यांच भुंकण भयावह् पार्श्वसंगीताची भुमिका चपखल बजावते.
           दिवसभर माणसांनी गजबजणाऱ्या बाजारपेठेत रात्री भटकंती करताना अनेक जुनी दुकानं नवी वाटतात. दिवसा ज्या पाट्या तसुभरही दिसत नाही त्या रात्री संपुर्ण दिसतातही आणि वाचता ही येतात. काही दुकानांच अस्तित्व दिवसा जाणवत नाही त्याचं  अस्तित्व मात्र रात्री  प्रकर्षाने जाणवत.
            जर शहरातुन नदी वाहत असेल आणि जर नदीला पाणी असेल तर, त्या नदीच्या वहाण्याचा आवाज तुम्हाला नदीच्या जवळ असलेल्या एखाद्या चौकातच येऊ लागतो. त्यात जर चंद्र व चांदण्याची रात्र असेल तर तुम्हाला त्याचं प्रतिबिंब नदीत दिसणं म्हणजे भाग्याचा योग. (अतिशोयक्ती). नदीच्या काठीच तुम्हाला गार वाऱ्याबरोबर रातराणीचा सुगंध जवळच कुठेतरी बाग असल्याची जाणीव करुन देतो .ही बाग मात्र कमालीची उलट्या काळजाची आहे दिवसा शांत राहते व रात्री मात्र आवाज करते. रातकिड्यांच्या त्या कर्कश आवाजाचे सुद्धा दोन प्रकार आहेत हे लक्षपुर्वक एेकल्यावर ध्यानात येईल.
            शहरातील प्रत्येक रस्ता ,चौक बाग ,दुकान ,सिग्नल ,गल्ली बोळ स्वतःच दुसर रुप दाखवत असतात . हे 'दुसरं रूप' अनुभवल्याशिवाय समजणार नाही,समजल्याशिवाय आवडणार नाही. एकदा तुमच्या शहरांच 'दुसरं रुप' अनुभवुन तर बघा....
                                            --परिक्षित रामचंद्र भुजबळ 

शनिवार, २७ फेब्रुवारी, २०१६

मित्र शाळा नि कल्लोळ                   मित्र शाळा नि कल्लोळ
काही दिवसांपुर्वी नाशिक ला जाण्याचा योग जुळून आला व माझ्या एका घनिष्ठ व जवळच्या मित्राची भेट घडून आली. सहा वर्षांपुर्वी माझी शाळा सुटली व त्यानंतर आम्ही पहिल्यांदाच भेटलो. फोनवर जेव्हा पण बोलण व्हायचं तेव्हा; ' सुट्टीत भेटू ' ' ह्या वेळेस नक्की' अस ठरवायचो पण भेट झालं नाही .
         आमची भेट घाईतच झाली तशी, फार काही बोलण झाल नाही आणि तेवढा वेळही नव्हता.
          घरी परतत असताना शाळेतल्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.
माझ्यासाठी शाळा म्हणजे माझा मित्र व माझी गॅगं .प्रत्येक वर्गात चार पाच गॅगं असायच्या आमची त्यातलीच एक. सातवी पर्यंत आम्ही सगळे एकाच वर्गात होतो पुढे सेमी मुळे सगळ्या गॅगं ची ताटातुट झाली. मी व माझा मित्र एकाच वर्गात होतो. पण गॅगं वेगळी झाली तरीही दुपारी जेवायला नि सकाळी खेळायला बरोबरच असायचो आम्ही. आमच्यासाठी क्रिकेट म्हणजे नारळाची फांदी, प्लॅस्टिक बॉल, आणि दफ्तर आमचे स्टम्प. आमच्या शाळेच मैदान भलतच मोठं,एकाचवेळी अनेकजण असल क्रिकेट खेळत.
         शाळेत गॅगं मध्ये खुप भांडण, तंटे होत मग एखादा जण गॅगं मधून फुटणार मग तो दुसऱ्या शत्रु गॅगं मध्ये जाणार मग त्यांचाशी पुन्हा भांडण मारामाऱ्या व सगळ्या भांडणांचा शेवट 'शाळा सुटल्यावर भेट!' याने होत. आमच्यात कधीच भांडण झाल नाही पण दुसऱ्यांची भांडण बघून खुप मजा लुटली.
          शाळेत दुपारी भाताची व्यवस्था म्हणजे पंगत. आमची थेट पंगत बसे. घरुन ताट व चमचा घेऊन यायची सूचना होती आम्हाला. दर दिवशी वेगळ्याप्रकार चा भात वाढला जाई. प्रत्येक वर्ग एक दिवशी वाढण्याची जबाबदारी घ्यायचा.
           शाळेत जीवशास्र च्या प्रयोग शाळेत एक काचेच्या कपाटात मानवी हाडाचा सांगाडा ठेवलेला होता. त्या बद्दल आम्हा सगळ्यांना कमालीची भितीयुक्त कुतूहल होते. त्या बद्दल मुलांनी अनेक गोष्टी पसरवल्या गेल्या होत्या .आज त्या गोष्टी आठवतात आणि हसवून जातात.
           वर्गात अनेक गमतीदार किस्से घडत. एकदा आमच्या दोन मित्रांनी मॅडमकडे कोणता मोबाइल आहे यावर पैंज लावली व त्यातील एका बहादराने थेट मॅडमलाच विचारले मग काय मॅडमने चांगलीच 'शाबासकी' दिली त्याला.
       अनेक आठवणी आहेत शाळेच्या,मित्रांच्या.अशीच हसत खेळत मजेत शाळा चालु होती आणि एकेदिवशी वडीलांची बदली झाली आणि सगळं संपल. त्याला भेटलो आणि सगळं आठवलं... तेवढ्यात हे ही लक्षात आलं की आमच्या शाळेला ५० वर्ष होणार आहेत. आणि माझ्यासाठी एकूणच सगळं काही म्हणजे " मित्र, शाळा नि कल्लोळ"
                       --परिक्षित रा. भुजबळ